sena cm

… हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही !

मुंबई, दि. १ जुलै

शिवसेनेत बंडखोरी करून भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. परंतु हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन केले आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केले त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शाह यांच्यात शिवसेना-भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचे ठरले होते. तसे झाले असते तर आज अडीच वर्ष झाली आहेत. जे काही घडले ते सन्मामाने झाले असते. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्ष पूर्ण केले असते. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपाने असे का केलं?

शिवसेना अधिकृतपणे भाजपासोबत होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलो. निवडणुकीच्या आधी हेच ठरले होते. मग मला कशाला मधे मुख्यमंत्री होण्यास भाग पाडले. तसे घडले असते तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता.

जे आता भाजपासोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करुन पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणत आहेत. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी ठणकावले.

माझ्याशी अशा पद्धतीने वागले याचे दु:ख झाले आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला. मला दिलेला शब्द पाळला असता तर निदान अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री नसणार आहे. यात भाजपाला आणि त्यांच्या मतदाराला काय आनंद आहे माहिती नाही.

एखाद्याने पद सोडल्यावर लोक रडतात असे क्वचित होते. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी कधी गद्दारी, हरामखोरपणा करणार नाही. अशा विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला उतरवून स्वत: मुख्यमंत्री होण्याचा जो अट्टहास केला आहे हा आवडला की नाही हे जनतेने ठरवायचं आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *