पालकमंत्री आदित्य ठाकरे मध्यरात्री 2 वाजता कुर्ला इमारत दुर्घटनास्थळी:
पालकमंत्री आदित्य ठाकरे मध्यरात्री 2 वाजता कुर्ला इमारत दुर्घटनास्थळी:
मुंबई, दि. 28 जून :
मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही 4 मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच पर्यटन, पर्यावरण आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री २.०० वाजता घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली.

कुर्ला इमारत दुर्घटना परिसरात एनडीआरएफच्या जवानांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ रात्री २.०० वाजता कुर्ल्यातील इमारत दुर्घटनास्थळी भेट दिली. यावेळी, संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधत त्यांनी मदत व बचावकार्य वेगात सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच, दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत जे लोकं जखमी झाले आहेत ते लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

ज्या इमारतींना पालिकेने नोटीस पाठवली असेल त्या इमारतीमधील नागरिकांनी इमारती खाली कराव्यात अशी कळकळीची विनंती आदित्य ठाकरे यांनी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना केली. मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुनर्तपासणी करण्यात येईल. मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारी नोटीस रहिवाशांनी घ्यावी आणि लवकरात लवकर अशा इमारती खाली कराव्यात. त्यामुळे, महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही अशा परिस्थितीत काम करणं मदतीचं ठरेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
