शिवसेनेत मोठी बंडाळी, एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतमध्ये
शिवसेनेत मोठी बंडाळी, एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतमध्ये…
मुंबई, दि. २१ जून:
विधान परिषदेच्या निकालाचा गुलाल उधळण्याच्या आधीच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कट्टर शिवसैनिक समजले जाणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये गेले आहेते. त्यांच्याबरोबर ३० आमदार असल्याची चर्चा असून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे समजते.
विधान परिषद निवडणुक होताच सोमवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी सुरतकडे कूच केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. याआधी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांनी बंड केले होते. आता एकनाथ शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेत मोठी बंडाळी झाली आहे. मागील काही दिवसापासून विशेषतः तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. शेवटी शिंदेंनी वेगळा मार्ग निवडल्याचे दिसते. दुपारी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत…बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे..बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.” या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घेतले नाही हे विशेष..
