आषाढी वारी पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर !

0
images (4)

आषाढी वारी पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर !

पुणे, दि. 20 जून :
कोविड विषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली ‘ज्ञानोबा-तुकोबांची’ पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदी वरून पंढरी कडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळयात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषा बरोबरच संविधानाचा देखील गजर करण्यात येणार आहे.

पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असून 21 जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर भजन – कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करत 10 जुलै रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.

दि. 21 जून रोजी आळंदी येथील चऱ्होली फाटा येथे दुपारी 3 वा. या दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 22 रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामास येईल, या दरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील.

दि. 23 (गुरुवार) रोजी पालखी मुक्काम स्थळाजवळ नाना पेठ येथे संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास ना. धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ सिने कलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शहा, निलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दि. 24 जून रोजी पासून ते दि. 10 जुलै पर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम संपूर्ण वेळ राबवले जाणार आहेत.

दि. 24 जून ते 10 जुलै पालखी सोहळा व संविधान दिंडी पालखीच्या ठरलेल्या मुक्काम मार्गावर मार्गक्रमण करत जाईल व पालखी दरम्यान पायी दिंडीत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वरील उपक्रम राबविण्याचे नियोजन बार्टी मार्फत करण्यात आले असून या संविधान दिंडीचा 10 जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *