नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना त्वरित अटक करा:
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना त्वरित अटक करा:
मुंबई, दि. 18 जून :
भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विरोधात मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. राज्य सरकारने या रोषाची दखल घेऊन एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम तयार करून नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
यासंदर्भात नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहले आहे. या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मोर्चे काढून प्रदर्शन केले आहे. मुंबईच्या पायधुनी आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व मुंब्रा पोलीस ठाण्यात नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात पोलिस तक्रारी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत यांना अटक झालेली नाही त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी व रोष आहे. या नाराजीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अस नसीम खान म्हणाले.
