“आशुडा….” पत्नी मयुरी देशमुखची भावनिक पोस्ट!

0
20200812_231509
मुंबई, दि. 12 ऑगस्ट
मराठमोळा उगवता तारा आशुतोष भाकरेच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. नैराश्येतून त्याने हे पाऊल उचलले असले तरी त्याचे हे जायचे वय नव्हते. आशुतोष व मयुरी यांचे करिअर आता कुठे बहरत होते. दोघांनी 20 जानेवारी 2016 मध्ये लग्न केले होते. संसार आणि करिअरमध्ये खूप काही करायच्या आतच आशुतोष सर्वांना सोडून गेला. 11 ऑगस्टला आशुतोषचा वाढदिवस होता. पण हा वाढदिवस साजरा करायला आशुतोष नव्हता.
मयुरीने आशुतोषच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मयुरी या पोस्टमध्ये म्हणते….
“आशुडा, तुझ्या वाढदिवशी सर्वोत्तम केक तयार करता यावा, केवळ यासाठी मी लॉकडाऊनच्या काळात 30 केक बेक केले. त्या सर्व 30 केक्सची पहिली चव तू चाखली होतीस, पण हा…30 वा वाढदिवस आधीच साजरे करण्याची ही तुझी पद्धत होती का? आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस”
“आम्हाला माहित आहे की तू उचललेले पाऊल भ्याडपणातून नाही, तर असहाय्यतेमुळेच होते, जे नैराश्यासोबत झालेल्या तुझ्या दीर्घकालीन संघर्षातून आले. पण गुणी बाळ माझं ते, आपण त्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ आलो होतो आणि तू असे वेड्यासारखे कृत्य केलेस. थोडं आणखी थांबायची आवश्यकता होती.”
“दररोज, प्रत्येक सेकंदाला, थोडासा जास्तीचा संयम, थोडेसे अधिक धैर्य आणि एक दीर्घ, निरोगी, आनंदी आयुष्य वाट पाहत होतं तुझी… आपली”
मला अर्ध्यावर सोडल्याबद्दल मी तुझ्यावर चिडावं की तू त्या वेळात माझा होतास याबद्दल कृतज्ञ असावं?? त्याने काय फरक पडतो? आता कशानेही काय फरक पडतो??
“तुझ्या आत्म्याचा शांततेने प्रवास व्हावा आणि देवदूतांनी तुला योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत आहोत…देवदूतांचे ऐक…आता नेहमीसारखा हट्टीपणा दाखवू नकोस.”
“मी, अभि, मम्मी, पापा तुझ्यावर निरतिशय प्रेम करतो आणि तू आमच्यासोबत असताना आम्ही ते पुरेसे व्यक्त केले असेल, अशी आशा आहे…इतक्या वेदना असूनही तू माझ्यावर खूप प्रेम केले आहेस, मीही तेच करत राहीन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
तुझीच, #बायकोतुझीनवसाची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *