योग व आयुर्वेदाचे भारतीय ज्ञान जगाला मार्गदर्शक !
योग व आयुर्वेदाचे भारतीय ज्ञान जगाला मार्गदर्शक !
पुणे, दि. 4 जून :
आयुर्वेद ही एक साधना आहे, हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून त्यासाठी अनुभवाचे ज्ञानही महत्वाचे आहे. योग आणि आयुर्वेदाचे आपले भारतीय ज्ञान जगाला मार्गदर्शक आहे. हे ज्ञान अनुभवसिद्ध आणि उपयुक्त आहे. आपण आयुर्वेदीक उपचार पद्धतीवर विश्वास ठेवायला हवा. निसर्गाने दिलेल्या या अद्भुत देणगीचा उपयोग रोगोपचारासाठी करायला हवा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते देशातील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ.सुभाष रानडे आणि डॉ.सुनंदा रानडे यांना परिवर्तन आयुर्वेद जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले की, आयुर्वेदाच्या अभ्यासकांनी संस्कृत अध्ययनाकडेही लक्ष द्यावे. आयुर्वेदाचे अध्ययन आणि अनुसरण आरोग्यशास्त्रात क्रांती घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासन सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, अभ्यासकांनी साधनेवर अधिक भर द्यावा तसेच आयुर्वेदाला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे.
डॉ. रानडे यांनी आयुर्वेदाचे ज्ञान भारताबाहेर पोहोचवून देशाची मोठी सेवा केली आहे. त्यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या कार्यामुळे भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली आहे, अशा शब्दात त्यांनी डॉ.रानडे यांच्या कार्याचा गौरव केला.
डॉ.मुजुमदार म्हणाले, यापुढील काळात आरोग्य विज्ञान क्षेत्रात कोणतीही एक शाखा स्वतंत्र ठेवण्यापेक्षा विविध शाखा एकत्र करून रुग्णांना चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयोग करण्याची गरज आहे. कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केल्यास त्याचा ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यास उपयोग होईल.
