राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले.
राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले.
पुणे, दि. १ जून :
राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला.
पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात ते दूरदृष्य प्रणालीद्वारे बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली ७५ वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा आहे. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे आशिर्वाद घेताना संस्कृतीची जपणूकही एसटीच्या माध्यमातून होते आहे.
कोरोना काळात अनेक जोखिमा असताना एसटी कर्मचाऱ्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक दिवशी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एसटीचा सहभाग आहे. एसटीमुळे आपले जीवन सुखकर झाले असे सांगणारे अनेक जण भेटतील. एसटीची ही वाटचाल चित्रफीतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत सुधारणा करताना नव्या संकल्पना शासन स्वीकारत आहे. सर्वात जास्त विद्युत बस आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले. विद्युत बसचे तंत्रज्ञान नवीन आहे, त्याची सवय व्हायला वेळ लागेल. एसटीची सेवा प्रदूषण विरहीत कशी होईल याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. काळाच्या गरजा आणि तंत्रज्ञानात होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यानुसार प्रगती करणे हे आपले उद्दीष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. एसटी बसला पुण्यातून सुरूवात झाली आणि पुण्यातच अमृत महोत्सवाला सुरूवात होत आहे, हा योगायोग असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांकडे आपल्या परिवारातले सदस्य म्हणून शासन पहात आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सेवा देताना तोटा सहन करावाच लागतो. हे लक्षात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुढील काही वर्षांची हमी शासनाने घेतली आहे. यापुढेदेखील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शक्य असलेली सर्व मदत करण्यात येईल. आपण एका मोठ्या वैभवाचे भाग आहोत याची जाणीवही कर्मचाऱ्यांनी ठेवावी. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे, त्यातील प्रत्येक सदस्याला आनंदात आणि समाधान ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. राज्याच्या प्रगतीचे एसटी कर्मचारी अविभाज्य घटक आहेत. आपण घेतलेले जनसेवेचे व्रत हातात हात घालून पुढे सुरू ठेऊया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
