पूर कालावधीत जलसंपदा विभागानेही दक्ष रहावे

0
images (69)

पूर कालावधीत जलसंपदा विभागानेही दक्ष रहावे.

मुंबई, दि. 31 मे :

पूर कालावधीत धरणातील पाणी साठ्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. स्थानिक यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. तसेच आपत्ती कालावधीत संपर्क यंत्रणा प्रभावी असण्यासाठी देखील आपत्ती विभागाने दक्ष रहावे. मुंबईत पाणी साठल्यामुळे मॅन होल वरती जाळी बसवून ज्या ठिकाणी जाळी बसवली आहे त्या ठिकाणी मॅन होल आहे हे समजावे यासाठी मोठी पताका उभारावी जेणेकरून या ठिकाणी लोक जाणार नाहीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

उपमुख्यमंत्री म्हणाले, कोकण तसेच कोल्हापूर, सातारा व सांगली या भागात वाढता पुराचा धोका लक्षात घेता राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची टीम कायमस्वरूपी या भागात राहण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपत्ती कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, गेल्या काही वर्षांत राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला पुराच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. पूर आणि भूस्खलनाचा सामना करण्यासाठी  कायमस्वरूपी दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनासंबंधी धोरणही लवकरच मंजूर होणार असून यामुळे दरड कोसळणाऱ्या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होईल. राज्यातील १४ जिल्ह्यात सॅटेलाईट फोन, ६९ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी अशा गावांचे पुनर्वसन, ज्या जिल्ह्यात पूर येतो अशा जिल्ह्यांना ११६ बोटी व १८ मदत व शोध कार्यासाठी अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून दिली आहेत. ज्या ठिकाणी वीज पडते अशा ठिकाणी वीज अटकावासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणे. सर्व जिल्ह्यांसाठी स्टेट ऑफ आर्ट उपग्रह संप्रेषण व्यवस्था  तसेच जीआयएससक्षम, आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारीत निर्णयासाठी सहाय्यभूत ठरणारी व्यवस्था निर्णय घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. जीव आणि मालमत्तेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रतिसाद आणि निर्णय घेणे यामुळे शक्य होईल, असेही मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा (Incidence Response System) ही राज्यात लागू करण्यात  येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा यासाठी ही यंत्रणा  काम करणार आहे. अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी  स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असली पाहिजे यासाठी जिल्ह्यांनी मागणी केलेल्या साहित्याची तसेच निधीची उपलब्धतता करून दिली आहे.

आपत्कालीन परस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेली पूर्वतयारी, या कालावधीत प्रभावी संपर्कासाठी सॅटेलाईट फोन, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक येथे तैनात  करणे,आपत्ती कालावधीत तात्काळ संपर्कासाठी १०७७ हा संपर्क क्रमांकही  नव्याने सुरू करण्यात आला आहे अशी माहिती विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार यांनी बैठकीत सविस्तर माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *