पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ख-या अर्थाने ‘गरीबांचे मसिहा’ !

0
images (12)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ख-या अर्थाने ‘गरीबांचे मसिहा’ !

मुंबई, दि: ३१ मे :

पंतप्रधान मोदींच्या रूपाने देशाला खरा कर्णधार लाभला असून त्यांनी सर्वसामान्य जनतेला नवभारत निर्माण होताना पाहण्याची संधी दिली आहे असे गौरवोद्गार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘गरीब कल्याण’ संमेलनात फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काँन्फरसिंगद्वारे थेट संवाद साधला.

फडणवीस म्हणाले की, गेली ८ वर्षे ही स्वातंत्र्यानंतरची मैलाचा दगड म्हणून लिहिली जातील. पंतप्रधान मोदी यांचा विकासाचा एकच फंडा असून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास याच मार्गाने देशाचा विकास साधला जात आहे. यापूर्वी बौद्धिक विकासाला प्राधान्य दिले जात असे. मात्र, सामान्य माणसाचा विकास होणे हा खरा विकास आहे. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन येणे हा खरा विकास आहे. गरीब कल्याणाचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविला. कुठलाही देश मूठभर लोकांच्या विकासामुळे प्रगत होत नाही. बहुजन आणि सर्वजन विकासाच्या प्रक्रियेत येत नाहीत तोपर्यंत विकास साधता येत नाही. देशातील गरिबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले आहेत असा विश्वास वाटतो. खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘गरीबांचे मसिहा’ आहेत.

यापूर्वी विकासाच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचत नसत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी योजनेतील ८५ टक्के पैसा दलाल खातात आणि केवळ १५ पैसे गरिबापर्यंत पोहोचतात हे मान्य केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराची व्यवस्था बदलून शेवटच्या माणसापर्यंत दिल्लीहून निघालेला एक रुपया पोहोचेल अशी व्यवस्था केली. १२ कोटी शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपये दिले. यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही. यु. एन. ने केलेल्या अहवालात भारतातील गरिबी बारा टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हटले आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरे बांधून पूर्ण झाली. ७ ते ८ कोटी घरे बांधण्यास सुरुवात झाली. येणाऱ्या काळात देशामध्ये हक्काचे घर नसलेले एकही कुटुंब राहणार नाही अशी व्यवस्था पंतप्रधान मोदींनी केली आहे. विरोधक महागाईच्या बाता मारतात. मात्र, गेली दीड वर्षे ८० कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य सरकारने पुरवले आहे. शौचालया अभावी महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरात शौचालय उभारण्यास भाजपा सरकारने मदत केली आहे. देशातील आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचवली आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून ८ कोटी घरांमध्ये सिलेंडर पुरवून त्यावर सबसिडीसाठी ६ हजार ४०० कोटी रुपये दिले गेले आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

विरोधक केवळ आंदोलन करतात त्यांना आंतरराष्ट्रीय परिस्थितीची कल्पना नसल्याची टीका करत श्री. फडणवीस म्हणाले, जगातील भाववाढीचा कोणताही परिणाम भारतातील गरिबांवर होणार नाही याची काळजी पंतप्रधान मोदी यांनी घेतली. कोरोना लस बनवणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश आहे. देशातील प्रत्येकाला मोफत लस पुरवण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. कोणतीही योजना राबविताना जात- पात, धर्म, पंथ न पाहता लोकशाही पद्धतीने गरिबांना मदत करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *