शाहरुखचा मुलगा आर्यनला NCB ची क्लिनचिट

0
455

शाहरुखचा मुलगा आर्यनला NCB ची क्लिनचिट..

मुंबई, दि. २७ मे :

आर्यन खान प्रकरणात एनसीबीकडून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली आहे. कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला प्रमुख आरोपी करण्यात आले होते. याप्रकरणी तो महिनाभर जेलमध्येही होता. मात्र एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यनचे नाव नाही. यामुळे एनसीबी व समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एनसीबीचे तत्कालीन विभाग प्रमुख समीर वानखेडे यांनी क्रूझवर छापा टाकून केलेल्या कारावईत शाहरुखचा मुलगा आर्यनसह १४ लोकांवर कारवाई केली होती. परंतु या प्रकरणी संशय व्यक्त होऊ लागला व ही कारवाईच बोगस असल्याचे आरोपही झाले नंतर समीर वानखेडेंची बदली झाली. एनसीबीने सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपपत्रात आर्यन खानसह ६ आरोपींचा समावेश करण्यात आलेला नाही.

एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नव्हते. त्यामुळे सुरुवातीला १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीअंती ६ जणांविरोधात पुरावे मिळाले नाहीत यामुळे आर्यन खानसह सहा जणांची नावे आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत.

क्रूझवर छापेमारी करताना एनसीबीबरोबर असलेले लोक हे भाजपाशी संबंधित असल्याचे आरोप झाले. तसेच समीर वानखेडे हे खाजगी आर्मीचा वापर करून अनेक मोठ्या नामांकित लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे असे आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. ही सर्व कारवाईच संशायास्पद असल्याचे मलिक यांनी म्हटले होते. आता आर्यन खानला क्लिनचिट मिळाल्याने समीर वानखेडे व त्यांच्या टीमवर काय कारवाई करणार असा सवाल विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *