नैना क्षेत्रात रेराआधी सिडकोची परवानगी अनिवार्य

0
20220513_200847

नैना क्षेत्रात रेराआधी सिडकोची परवानगी अनिवार्य…..

नवी मुंबई, दि. 18 मे :
नैना क्षेत्रात वेगाने वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी या इमारतींचे रेरा रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी त्यांना सिडकोची मान्यता आहे अथवा नाही हे तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे नैना क्षेत्रात वेगाने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामे रोखण्याला मोठी मदत होणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नैना क्षेत्रातील भूखंडावर आकारण्यात येणारे विकास शुल्क शेवटच्या घटकाकडून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच नैना प्रकल्पातील टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये सामील होणाऱ्या भूखंड धारकांना लवकरात लवकर त्यांची प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसराचा विकास सुनियोजितपणे व्हावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नैना प्राधिकरणाशी संबंधित भूमीपूत्र आणि विकासकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्यांना दिलासा देण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.

नैना क्षेत्र हे नव्याने विकसित होत असलेले क्षेत्र असल्याने ते अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकू नये ही आपली प्राथमिकता आहे. त्यासोबतच नैनातील टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये सामील होत असलेल्या शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा आणि त्यांच्यावर विकास शुल्काचा बोजा न टाकण्याचा शब्द मी दिला होता. त्यानुसार भूमीपुत्रांना दिलासा देणारे हे दोन्ही निर्णय मी घेतले आहेत असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नैनामध्ये मुख्य रस्त्याच्या कडेला विशेष करून माथेरान रोडवर ग्रामस्थ आणि स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. नैना क्षेत्रामध्ये सिडको हे नियोजन प्राधिकरण असल्याने रेरा मध्ये सदर प्रकल्पांची नोंदणी करण्यापूर्वी सिडकोने सदर प्रकरणाची परवानगी दिली आहे का? याची पडताळणी करूनच सदर प्रकल्पांची नोंदणी करण्याची विनंती महारेराला करण्यात आलेली आहे. तसेच नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विरोधी विभागाला बळकटी आणण्यासाठी महसूल विभागाकडे 5 पदे पुरवण्याची मागणी करण्यात आलेली होती. महसून विभागाने ही मागणी देखील मान्य केली आहे. त्यामुळे नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *