ज्या भागात पाऊस नाही तिथे निवडणूका घ्या !

0
cou

ज्या भागात पाऊस नाही तिथे निवडणूका घ्या !

नवी दिल्ली, दि. १७ मे:

राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांच्या निवडणुका होणार का? पावसाळ्यात निवडणुका होणार का ? याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ज्या भागात पावसाची अडचण नाही तेथे निवडणूक घेण्याबाबत विचार करावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच या निवडणुका पावसामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात घेण्यात याव्यात अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाने पावसाचे कारण देत या निवडणुका ऑक्टोरबर, नोव्हेंबर महिन्यात घेण्याची परवानगी द्यावी असे प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केले होते. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, राज्यात ज्या ठिकाणी पावसाची अडचण येणार नाही त्या ठिकाणी या निवडणुका घेता येतील का? यावर विचार करावा.

राज्यात २१ महानगरपालिका, २१० नगरपालिका, १० नगरपंचायती आणि १९३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. तर जोपर्यंत ओबीसी आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका राज्य सरकार व सर्व राजकीय पक्षांनी घेतली आहे. हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जर निवडणुका झाल्या तर त्या ओबीसी आरक्षणाशिवायच होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *