पतसंस्थांमधील ठेवीवर 5 लाखांचे विमा संरक्षण?
पतसंस्थांमधील ठेवीवर 5 लाखांचे विमा संरक्षण?
सांगली दि. 17 मे :
सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण<span;> देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. सहकारी आर्थिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. संस्था चालविणाऱ्या संचालकांनी शासनाचे धोरण व सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोल्हापूर रोड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, मर्या सांगली यांच्या नुतन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
सहकारी पतसंस्थांसमोर फार मोठी आव्हाने आहेत, संपुर्ण सहकार क्षेत्रासमोरच अनेक अडचणी आहेत. तरीसुध्दा या सर्व अडचणींवर मात करुन सहकार पुढील वाटचाल करीत आहे. सहकराचे सक्षमीकरणासाठी शासनही पुढाकार घेत आहे. वेगवेगळ्या उपाया योजना राबवित आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकरी संस्था योग्य चालण्यासाठी संस्थेतील संचालकांचा कार्यभारही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे संचालकांची आपल्या सभासदाचे व संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख व पारदर्शी करावे त्यामध्ये व्यवसायीकता यावी व आधुनिकीकरणाचा आवलंब करावा यामध्ये डीजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंगसेवा उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत शासन नेहमीच सहकारी संस्थांच्या पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची इमारत ही अत्यंत देखणी उभारण्यात आली असून ती सांगली शहराच्या वैभवात भर घालेल. असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यामध्ये अनेक कार्यक्रमांसाठी जाणे होते पण एकाद्या पतसंस्थेची अशी इमारत पाहण्यात आली नाही. ही वास्तु अत्यंत सुंदर पध्दतीने तयार करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या जवळपास 51 शाखा कार्यरत आहेत. आता आणखीन 10 शाखा सुरु होणार आहेत. या संस्थेतून चालणारा कारभार कर्मवीर आण्णांच्या नावाला शोभेल अशा पध्दतीचे आहे.
