शिर्डीबरोबरच इतर जिल्ह्यातील विमान वाहतूक सेवाही दर्जेदार असावी !
शिर्डीबरोबरच इतर जिल्ह्यातील विमान वाहतूक सेवाही दर्जेदार असावी !
मुंबई, दि. 10 मे :
राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधानान्ये पूर्ण करा. शिर्डी विमानतळावरून ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे तसेच शिर्डी येथून कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बेंगलोर, चेन्नई व दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत. शिर्डीबरोबरच इतर जिल्ह्यातील विमान वाहतूक सेवा दर्जेदार असावी, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी ‘बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर’ या श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान केले.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, मिहान येथे सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्पांची कामे गतीने करावीत. समृध्दी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानवाहतूकीस चालना मिळेल त्यामुळे या भागातील प्रस्तावीत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेली कार्यवाही,अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावीत. पालघर येथे सॅटेलाईट विमानतळाचा प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर, चिपी, नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून शिर्डी विमानतळाने ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सद्यस्थितीत एमएडीसीमार्फत सुरू असलेले व भविष्यात राबविण्यात येणारे उपक्रम, मिहानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, केंद्रशासनाची उडाण योजना राबविण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबत व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण केलेल्या विमानतळांचे हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे करावे जेणे करून एकाच यंत्रणेकडे विमान सेवेच्या विकासाबाबत काम करता येणे सुलभ होईल असेही संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले.
