ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपामुळेच धोक्यात !
ओबीसींचे राजकीय आरक्षण भाजपामुळेच धोक्यात !
मुंबई, दि. 9 मे :
इतर मागास वर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण संपवले गेले आहे. ओबीसींचे राजकीय नेतृत्व पुढे येऊ नये म्हणूनच भाजपाने ही खेळी केली असून ओबीसींचे हक्काचे आरक्षण गेले त्याला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपाने केले असून ही सुरुवात आहे. भविष्यात अशाच पद्धतीने इतर समाजाचे आरक्षण कवच काढून टाकण्यास भाजपा सरकार मागेपुढे पहाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना राजहंस म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष हे आरक्षणविरोधी आहेत. वंचित, पीडित, मागास घटकाला समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाने आरक्षणाचे कवच दिले आहे पण हे आरक्षण भाजपा व आरएसएसच्या डोळ्यात नेहमी खूपत आले आहे. जातीवर आधारीत नाही तर आर्थिक आधारावर आरक्षण असावे अशी आरएसएस व भाजपाची भूमिका राहिलेली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात आले असताना केंद्रातील भाजपाचे सरकार मात्र ते टिकावे यासाठी कसलीही मदत करत नाही उलट महाराष्ट्राची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र भाजपाचा एकही नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाप्रश्नी मदत मागत नाही.
महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षण टिकावे यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. न्यायालयीन लढाई लढली जात आहे पण त्यात भाजपाचे काहीही योगदान दिसत नाही. महाविकास आघाडीवर खापर फोडून आपली राजकीय पोळी भाजपण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. भाजपाची ही राजकीय चाल वेळीच ओळखून त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवावी, असे आवाहनही राजहंस यांनी केले आहे.
