तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही !
तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही !
मुंबई, दि. 2 मे :
बाबरी ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं. बाबरी ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता ? बाबरी पडली तेव्हा शिवसेनेतला एकही नेता हजर नव्हता. बाबरीच्या खटल्यात ३२ आरोपी होते. त्यात एकही शिवसेनेचा नेता नव्हता. मशिदीवरचे भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली, असं सगळीकडे सांगत सुटतात अशी जहरी टीका करत आजकाल काहींना आपण हिंदू असल्याचं वाटतं. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. हा अठरापगड जातीच्या लोकांनी तयार झालेला महाराष्ट्र आहे अशा शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित बूस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जेलमध्ये असल्याने महाराष्ट्राची बदनामी होत आहे. ज्यांनी राम जन्मावर शंका घेतली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे काम शिवसेनेने केले आहे. आजकाल हनुमान चालीसा म्हटली की, राजद्रोह होतो. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हटल्याने रामाचं राज्य उलथवलं जाईल की, रावणाचं ? मग तुम्ही रावणाच्या बाजूचे आहात की, रामाच्या ? हे सांगा असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारला.
पत्रकारांनी विरोधात लिहिलं की, त्यांच्यावर कारवाई होते. कोणीही विरोधात बोललं की त्यांच्यावर कारवाई होते. एकप्रकारची अघोषित आणीबाणी महाराष्ट्रात लागली आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली. येणाऱ्या १४ तारखेनंतर पोलखोल सभा घेऊन सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री विकासावर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी अपेक्षाभंग केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. लोडशेडिंगमुळे महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने गेला आहे. आम्ही सत्तेत असताना महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर नेले होते. नेते शरद पवार हनुमान चालीसा म्हटल्याने रोजगाराचे प्रश्न सुटतील काय? असे म्हणतात मात्र, इफ्तार पार्टी झोडल्यावर हे प्रश्न सुटणार आहेत का ?
सत्ताधाऱ्यांना केवळ बिल्डर आणि बार चालकांची काळजी आहे. त्यामुळे त्यांनी बार चालकांची लायसन्स फी आणि इंग्रजी दारूवरील टॅक्स ५० टक्के कमी केला. पेट्रोलवरील टॅक्स कमी करायला त्यांचे हात धजावत नाहीत. केंद्र सरकारने राज्याला जीएसटी परतावा प्रामाणिकपणे केला आहे. मात्र, केंद्रावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. मंत्री नबाब मलिक जेलमध्ये असताना एक सरकारी निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री “वर्क फ्रॉम होम” करत होते. आता त्यांचे मंत्रीही “वर्क फ्रॉम जेल” करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
सत्ताधाऱ्यांचा मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर लक्ष वेधताना फडणवीस म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत कोविड सेंटर उभारणी, औषध खरेदी, नालेसफाई, भंगार सफाई, कामगार योजना असे अनेक घोटाळे झाले असून अगदी वेश्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानातही घोटाळा झाला आहे. आमच्यावर तुटून पडला तर तुम्ही तुटालही आणि पडालही, जमलं तर भ्रष्टाचाराच्या टोळीवर तुटून पडा असे आव्हान फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना केले.
