विकासाच्या आघाडीवर महाराष्ट्राची चौफेर कामगिरी
विकासाच्या आघाडीवर महाराष्ट्राची चौफेर कामगिरी…
मुंबई, दि. १ एप्रिल :
राज्य शासनाने कोविड काळातही विकासकामांमध्ये खंड पडू न देता सर्व क्षेत्रात चौफेर कामगिरी केली आहे. राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रातिनिधिक सचित्र प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
सचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून योजना व विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मुंबई शहरचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वरळी सी-फेस, कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित सचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री ठाकरे व मंत्री अस्लम शेख बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर, संचालक गोविंद अहंकारी, संचालक दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोविड-१९ सारख्या महासंकटासोबतच महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींचा सामना करत राज्य शासनाने विकास कामांमध्ये सातत्य ठेवत चांगली कामगिरी केली. कोविड कालावधीत राज्यातील अर्थव्यवस्था कार्यान्वित ठेवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. राज्य शासनाच्या या कामगिरीस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शन सारखे उपक्रम महत्वाचे आहेत.
मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या विभागीय स्तरावर आयोजित प्रातिनिधिक प्रदर्शनांना नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
