कोल्हापूर पोटनिवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय.
कोल्हापूर पोटनिवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय.
कोल्हापूर, दि. १६ एप्रिल ;
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव करून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव १९ हजार मतांनी विजयी झाल्या. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी सरळ लढत झालेल्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतक्या मतांनी विजयी झाल्या तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७४२६ मते मिळाली. जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार ठरल्या.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती तर भाजपाने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न केला होता.
काँग्रेसकडून या निवडणुकीची सर्व जबाबदारी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या खांद्यावर होती. सतेज पाटील यांनी पहिल्यापासून पद्धतशीरपणे आखणी करून प्रचार केला. राज्य पातळीवरही सर्व महत्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा घेतल्या तसेच बुथलेवलवरही जोरदार काम केल्याने हा विजय सुकर झाला.
कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती, अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली.
