शरद पवारांच्या घरावर हल्ला करणा-या कामगारांवर कारवाई होणार

0
images (43)

 

शरद पवारांच्या घरावर हल्ला करणा-या कामगारांवर कारवाई होणार..

मुंबई, दि. 12  एप्रिल :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा परिवहन मंत्री, ॲड. अनिल परब यांनी दिला.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पवार यांच्या घरावरील हल्ल्यात  सहभाग असलेल्या कामगारांवरील गुन्ह्याचे स्वरूप बघून शिस्त व आवेदन पद्धतीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

कोविड महामारीमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती, त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत. संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. तसेच कोविड आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे कोविडपूर्व काळात जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करीत पुन्हा एसटी नव्या दमाने सुरु करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *