डहाणुकर वाडीतील नाला, पोयसर नदीला जलपर्णीचा पुर्ण विळखा
डहाणुकर वाडीतील नाला, पोयसर नदीला जलपर्णीचा पुर्ण विळखा.
मुंबई, दि. ११ एप्रिल :
पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसर दरम्यानच्या नाल्यांची पाहणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. नाल्यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना ? असा सवाल करीत हे कधी साफ होणार ? याबाबत चिंता त्यांनी व्यक्त केली. आम्ही दौरे करायला लागताच पन्नास लाखाच्या घड्याळात ज्यांचे टायमिंग चुकले ते आता जागे झाले, अशी टीका ही आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.
सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाने नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित केला असून तिस-या दिवशी मालाड, गोरेगाव, बोरिवली, दहिसर या भागातील नाल्यांची पाहणी करण्यात आली. डहाणुकर वाडीतील नाला असो वा पोयसर नदी यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून अद्याप अनेक ठिकाणी कामाला सुरूवात झालेली नाही. तर काही नाल्यामध्ये आता एक एक जेसीपी, पोकलेन मशिन उतरवून काम करण्यात येते आहे. त्यामुळे कामांची गती वाढवणे आवश्यक असून या वेगाने गेल्यास कधी कामे पुर्ण होणार ? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
कामांना अद्याप कुठेही वेग आलेला नाही. कामांना गती देण्याची गरज आहे. मुळातच कामांना मंजूरी देण्यास विलंब झाला. भाजपाने रेटा वाढविला त्यानंतर प्रशासन जागे झाले. आम्ही नाल्यावर भेटी देऊ लागताच प्रशासन आणि कंत्राटदारांची पळापळ सुरू झाली आहे. पण ज्यांची ही जबाबदारी होती ते कारभारी मुदत संपली असं सांगून फरार झाले होते. भाजपाने दौरे सुरू करताच पालकमंत्र्यांनी आता दौरा करण्याचे जाहीर केल्याचे वाचनात आले. ज्यांचे पन्नास लाखांच्या घड्याळात टायमिंग चुकले होते त्यांना भाजपामुळे जाग आली आहे. मुंबईकरांची आता आठवण झाली अशी टीका आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली.
