सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब पंढरी पुन्हा उभी करू
सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब पंढरी पुन्हा उभी करू…
महूद, सोलापूर,दि. 8 एप्रिल :
सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे वर्षाला ३ हजार कोटींपर्यंत उत्पादन घेतले जायचे. यंदा ८०० कोटींचे उत्पादन मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. डाळिंबाची ही पंढरी धोक्यात आली असून महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब पंढरी पुन्हा उभी राहण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
महूद ता. सांगोला येथे शेतकरी परिषद व जलक्रांती करणाऱ्या ग्रामस्थांचा कौतुक सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जागतिक जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह, मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर, आमदार ऍड.शहाजी बापू पाटील, माजी आमदार दिपक साळुंखे,शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख, डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, अखिल भारतीय महात्मा समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले की, सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्हा डाळिंब पंढरी शेतकऱ्यांनी जिद्दीने, कष्टपूर्वक डाळिंब बागा उभ्या केल्या. त्याचा कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागला. मर रोग, तेलकट डाग या डाळींबाच्या प्रश्नावर मार्ग शेतकरी काढत होते. पण गेल्या २ वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींने डाळिंब उत्पादकांना बेजार केले. पिन होल बोरर रोगाने डाळिंब बागा जळून जाऊ लागल्या. रोग एवढा भयंकर की, बाग रोगातून वाचवणे शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले. त्यामुळे शेतकरी बागा तोडू लागलेत. डाळिंब पंढरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर पोचली. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन डाळिंब उभ्या करण्यावर भर दिला होता. या देशात शेतीची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे एकमेव नेतृत्व शरद पवार साहेब हे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा या डाळिंब उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबाचे क्षेत्र ४९ हजार हेक्टर होते. सांगोला तालुक्यातील क्षेत्र १९ हजार हेक्टर होते. डाळिंब पंढरीतील ६० टक्के बागा तोडण्यात आल्यात, आणखी १० ते १५ टक्के बागा शेतकरी तोडण्याच्या मनस्थितीत आहेत. डाळिंब वाचण्यासाठी रोग भयंकर झाला आहे. रोग आटोक्यात आणण्यासाठी खर्च मोठा आहे. तो परवडत नसल्याने शेतकरी बागा तोडताहेत. त्यामुळे बागा वाचवण्यासाठी शासनाची मदत व्हायला हवी अशी मागणी शेतकरी करत आहेत. त्याचवेळी डाळिंब पंढरी पुन्हा उभी रहावी यासाठी शेतकरी मागणी करत आहेत. शेतकरी जुनी रोजगार हमी योजनेसारखी योजना असावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. ही डाळिंब पंढरी वाचवण्यासाठी खा. शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, कृषी मंत्री दादा भुसेजी यांच्यापर्यंत शेतकऱ्यांचा मित्र म्हणून डाळिंब पंढरीची व्यथा पोचवणार आहे. तसेच या प्रश्नांवर डाळिंब उत्पादकांच्या प्रतिनिधींसमवेत सरकार आणि प्रशासनाची बैठक व्हावी यासाठी माझा पाठपुरावा राहील. आधुनिक तंत्रज्ञान, नवे संशोधन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोचावे, असा माझा आग्रह राहील. एवढेच नव्हे तर मंत्रिमंडळ बैठकीत मी डाळिंब उत्पादकांची बाजू लावून धरेन, अशी ग्वाही देतो. डाळिंब उत्पादकांच्या सोबत सरकार पूर्वी होते आणि यापुढे राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.
