जग जिंकायचे असेल तर मोठी स्वप्ने बघा !
जग जिंकायचे असेल तर मोठी स्वप्ने बघा !
अलिबाग, दि. ३१ मार्च :
आपल्याला जग जिंकायचे असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत. समोर आलेल्या अडचणींवर आत्मविश्वासाने मात करून विकासाकडे वाटचाल करायला हवी आणि यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असेन, आपण सर्वजण एकत्र काम करू, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील इन्क्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमीपूजन पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची राजधानी रायगडाचा पायथा तर दुसरीकडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. एकीकडे स्वराज्य दाखविलेला तर दुसरीकडे या देशाला संविधान दिलेले. या दोन्ही महापुरुषांच्या नावाशी जोडलेले हे तांत्रिक विद्यापीठ आहे. हे महाविकास आघाडीचे शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तरुणांसाठी, महाराष्ट्रासाठी जे काही चांगले असेल ते अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुठल्याही कॉलेजमध्ये राजकारण होऊ नये पण ते राजकारण चांगल्यासाठी असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र शिक्षण व्यवस्थेची स्थिती सुधारावी म्हणून सर्वोतोपरी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. आजच्या काळात भारतासाठी महत्त्वाचे म्हणजे येथे मोठ्या संख्येने असलेला युवावर्ग. या युवावर्गाला शिक्षण चांगले पाहिजे, चांगला रोजगार मिळाला पाहिजे, तो सहज उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याबरोबरच चांगले आरोग्यही मिळाले पाहिजे.
शिक्षणाचे धोरण बदलत असताना त्यात आंतर राष्ट्रीयीकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर युवावर्गासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षणानंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याचाच विचार करून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या मुला-मुलींना आपल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये कसे समाविष्ट करून घेऊ शकतो, याचा आपण विचार करीत आहोत, त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येणार आहेत. युवावर्गाने रोज नवनवीन काय विचार करू शकता, मोठी स्वप्न काय बघू शकता, तुमची ताकद कशात आहे हे ओळखून तसा विचार झाला पाहिजे. केजी टू पीजी शिक्षण पद्धतीत आपण कशा प्रकारे अधिक सुधारणा करू शकतो याचा विचार व्हायला हवा.
ग्रामीण भागातील शाळेमध्ये देखील अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, फुटबॉल, हॉकीचे मैदान उपलब्ध करून द्यायला हवे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी २००४ साली आपल्याला “इंडिया 2020” आणि सुपर पॉवर होण्याचे स्वप्न दाखविले. त्यादृष्टीने आपण नक्की काय शिकलो व का शिकतो यावर लक्ष केंद्रीत केले तरच आपला देश पुढे जाऊ शकतो, हा विचार दिला. तरूण वर्गाने विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे विचार, कृती आत्मसात करून समृद्धीकडे वाटचाल करायला हवी. सोशल मिडीयाचा सकारात्मक उपयोग करून राज्याच्या अन् देशाच्या प्रगतीला हातभार लावायला हवा. ग्रामविकासाबरोबरच मानव विकासही तितकाच महत्वाचा आहे. आणि हा विकास शाश्वत विकास कसा होईल, यावर लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
