…मग अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी का नको?

0
20200808_192514
मुंबई, दि.8 ऑगस्ट
सुशांतसिंगच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्यासाठी सर्व स्तरातून वातावरण निर्मिती करण्यात आली आणि अखेर या प्रकरणाची CBI चौकशी करेल असा निर्णय वरच्या पातळीवर झाला आहे.  सुशांतसिंगच्या आत्महत्येचा राजकीय मुद्दा करून आपले राजकीय हित साधण्यात कोणत्या पक्षाचा पुढाकार राहिला हे सर्वांना माहित आहेच. सुशांत आत्महत्याच्या आडून राजकीय हिशोब चुकता करण्याचे फासे टाकले असतानाच आता दुस-या बाजूने भाजपालाही अडचणीत आणण्यासाठी फासे टाकले आहेत.
भाजपाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने अलिबागच्या अन्वय नाईक आत्महत्येचा मुद्दा उचलला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्नब गोस्वामीची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. तत्कालीन भाजप सरकारने हे प्रकरण का दाबले असा प्रश्न उपस्थित केला आहे. आत्महत्येच्या चिठ्ठीत अर्नब गोस्वामीचा उल्लेखही आहे. असे असताना अर्नबला वाचवण्यासाठी कोणी आदेश दिले होते याची चौकशी करा, अशी मागणीही सरदेसाई यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून केली आहे.
शिवसेनेने भाजपा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठीच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण बाहेर काढले असताना या आगीत काँग्रेसनेही तेल ओतले असून अन्वय नाईक आत्महत्येच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून हा मुद्दा लावून धरला आहे.या ट्विटमध्ये सावंत म्हणतात, सुशांतसिंग राजपूत याची सुसाईड नोट नव्हती तरी सर्वांची चौकशी होत आहे आणि अन्वय नाईकनी आपल्या सुसाईड नोटमध्ये अर्नब गोस्वामीचा उल्लेखच केला नव्हता तर दोषीही ठरवले होते. मग अर्नबला साधं चौकशीलाही फडणवीस सरकारने का बोलावलं नाही. अर्नबला का वाचवत होते? तेव्हा सीबीआय भाजपाला का आठवली नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवसेनेला काँग्रेसची साथ मिळाली असल्याने आता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणही चर्चेत आले असून भाजपावर ते शेकू शकते. यात कोण कोणाचा हिशोब चुकता करतो ते लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *