‘ई-कुबेर’प्रणालीमुळे जलद, सुरक्षित व विश्वासार्ह काम होण्यास मदत होईल
‘ई-कुबेर’प्रणालीमुळे जलद, सुरक्षित व विश्वासार्ह काम होण्यास मदत होईल…
मुंबई, दि. २९ मार्च;
रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांसाठी विकसित केलेल्या ‘ई-कुबेर’ प्रणालीच्या वापराने कोषागारांचे कामकाज जलद, सुलभ, सुरक्षित, विश्वासार्ह होणार असून ‘ई-कुबेर’ प्रणाली भविष्यात राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारांमध्ये कार्यान्वीत करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
मुळशी (जि. पुणे) उपकोषागार कार्यालयातील ‘ई-कुबेर’ या रियल टाईम व्हाऊचर जनरेशन प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं केले. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले की, राज्य व केंद्र शासन, राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक उपक्रमांना वित्तीय सेवा देणारी सुरक्षित व सर्वसमावेशक प्रणाली म्हणून ‘ई-कुबेर’ प्रणालीची ओळख आहे.वापरायला सहज, सुरक्षित असणाऱ्या या प्रणालीमुळे कोषागार कार्यालयांच्या कामकाजाचा वेग वाढणार आहे. ‘ई-कुबेर’ प्रणालीमुळे ‘चेक’ क्लिअरींग तसंच प्रदानाचा कालावधी कमी होईल. शासकीय निधी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पडून राहणार नाही. कोषागार कार्यालयामसाठी उपयुक्त ठरलेल्या या प्रणालीचं प्रशिक्षण कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
