आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने !
आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने !
मुंबई, दि. २५ मार्च:
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची चिरफाड केली. शेलक्या शब्दात भाजपाचा खरपूस समाचार घेत त्यांनी अधिवेशनचा आजचा दिवस गाजवला.
मुख्यमंत्री म्हणाले, मंत्री नवाब मलिक हा दाऊदचा माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. मग तो पाचवेळा निवडूण येतो, मंत्री होतो तरीही केंद्रीय यंत्रणांना समजले नाही. त्यांना आता समजते की तो दाऊदचा माणूस आहे, मग केंद्राच्या यंत्रणा काय करतात ? नुसत्या थाळ्या वाजवायचे, दिवे पेटवायचे काम करतात का? असा थेट हल्ला करत नवाब मलिक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बचाव केला.
दाऊद आहे कुठे?आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? मग तो दाऊद आहे कुठं हे कुणालाच माहिती नाही. दाऊदला आम्ही फरफडत आणू असे गोपीनाथ मुंढे म्हणाले होते. अमेरिकेने ओसामा बीन लादेनला घरात घुसुन मारले तसे दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा असे आव्हान दिले. आम्ही सगळे भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसे आहोत असे विरोधक आरोप करतात परंतु पहाटेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते असे टोलाही मुख्यमंत्र्यांनी लावला.
ईडीच्या कारवाईवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ही ईडी आहे का घरगडी ? असे म्हणत, आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. कुंटुंबियांची बदनामी केली जात आहे ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट आहे. मर्द असशील तर मर्दासारखं अंगावर ये, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातात. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत. तुम्ही जे माझ्या कुटुंबियांला बदनामी करायचे चाळे केले आहेत. तुम्हाला सत्ता पाहिजे ना मग मी तुमच्या सोबत येतो, मला तुरुंगात टाका.
उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त दारुची दुकाने आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणणं खूप मोठी चूक केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करू नका. रावणाचा जीव बेंबीत, तसा काही जणांचा मुंबईत आहे असा टोला मारला.
