चांगला प्रस्ताव मांडला तर एसटी कर्मचारीही विचार करतील

0
dada

चांगला प्रस्ताव मांडला तर एसटी कर्मचारीही विचार करतील..

मुंबई, २२ मार्च:

गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे कशी उध्वस्त झाली ते मी अनुभवले आहे. एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख संसार उध्वस्त होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही सगळे श्रेय घ्या पण एसटीचा संप मिटवा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, माझे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. आईसुद्धा कापड गिरणीत काम करायची. दत्ता सामंत यांनी पुकारलेल्या गिरणी कामगारांच्या संपात लाखो कामगारांची घरे कशी उध्वस्त झाली ते पाहिले आहे. मी स्वतः या संपामुळे होरपळलो आहे. एसटीचा संप मिटला नाही तर एक लाख कुटुंबे संकटात येतील. गेले चार महिने एसटी कर्मचारी रस्त्यावर बसले आहेत, काहीजण निराशेने आत्महत्या करत आहेत आणि सरकार दुर्लक्ष करत आहे. अजित पवार यांना माझे आवाहन आहे की, सगळे श्रेय तुम्ही घ्या पण संप मिटवा. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसमोर चांगला प्रस्ताव मांडला तर ते सुद्धा दोन पावले मागे जातील.

एसटीच्या संपामुळे कर्मचाऱ्यांचे वेतनाअभावी खूप हाल होत आहेत. जनतेचेही खूप हाल होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना नेहमीपेक्षा खूप जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. मुलींना शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणे अवघड झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारमध्ये विलीनकरणाची आहे. ती बरोबर आहे. पण ही मागणी तुटपुंजा पगार आणि तोही नियमित मिळत नाही यामुळे पुढे आली. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करणे, समान सुविधा देणे आणि वेतनाची हमी देणे असा चांगला प्रस्ताव मांडला तर कर्मचारीही विचार करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *