… नौटंकी कसली करता, चौकशीला सामारे जा !
… नौटंकी कसली करता, चौकशीला सामारे जा!
मुंबई, दि. १६ मार्च:
राज्यातील काही भाजपा नेत्यांवरील कारवाईवरून भाजपाने आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. यावरून राजकारण तापले असून राज्यातले पोलीस एखाद्या गुन्ह्याप्रकरणी भाजपा नेत्यांची चौकशी करत असतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे, रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला करता, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत विचारला आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या लोकांच्या चौकशा सुरू होतात, अटकेची कारवाई होते तेव्हा भाजपच्या लोकांना गुदगुल्या होतात. आता त्यांच्याविरोधात राज्यातील पोलिसांनी चौकशी सुरू केली तर आरडाओरड सुरू केली आहे. राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत हे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील पोलीस खोटे गुन्हे दाखल करणार नाहीत. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. पुराव्यांशिवाय कारवाई करणार नाहीत.
मुंबई बँक घोटाळा हे एक टोक असून पीएमसी बँक घोटाळा, भूखंड घोटाळ्यात काही लोक गजाआड गेले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असेही संजय राऊत म्हणाले.
