अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद..
मुंबई, दि. ११ मार्च:
राज्यातील सर्व क्षेत्रांचा विचार करून शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा विकास, विद्यार्थी, महिला, अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी बांधव, पोलिस अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्यातील पायाभूत सुविधा विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नगरविकास विभागाने गेल्या दोन वर्षांत एमएमआरडीए, सिडको, पीएमआरडीए यांसारख्या यंत्रणांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आदी क्षेत्रात अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. विभागासाठी जवळपास पावणे नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.. राज्यभरात समृद्धी महामार्गासह अनेक महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण एक्स्प्रेस वे सारखा नवा प्रकल्प हाती घेतला जाणार असून त्यासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाला हातभार लागेल, नवे उद्योग येतील, रोजगार निर्मिती होईल, पर्यटन विकास होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील माझ्या पोलिस बांधवांना मिळणाऱ्या विशेष भत्त्यात वाढ केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. सैन्य दलाच्या धर्तीवर अतिसंवेदनशील भागातील पोलिसांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कौशल्यविकासावर अर्थसंकल्पात विशेष भर दिला आहे. एकंदरीत कोविड आणि अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झालेला असतानाही राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही नगरविकासमंत्री शिंदे यांनी सांगितले.
