पंजाबमधील बदल काँग्रेसला धक्का देणारा !
पंजाबमधील बदल काँग्रेसला धक्का देणारा !
मुंबई दि. १० मार्च :
पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, पंजाब असे एक राज्य होते ज्याठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळे चित्र बघायला मिळत आहे. ‘आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे, त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्या पध्दतीने प्रशासन दिले त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा फायदा पंजाबमध्ये ‘आप’ ला झाला असे स्वच्छ दिसत आहे.
पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचे राज्य स्थापन झाले.लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा.
देशात आज प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्चपासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पाऊले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे असेही शरद पवार म्हणाले.
भाजपकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला असता, ठिक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा देत महाविकास आघाडीची भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.
