सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच !

0
IMG_20210927_175130

सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच !

मुंबई, दि. 10 मार्च:
महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. हा प्रवाह असाच सुरू ठेवण्यासाठी धोरणात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे. महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण आणणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महिला सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचा सार्थ अभिमान आहे. सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकून काम केले. ताराराणी, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी आपापल्या क्षेत्रात अतिशय विलक्षण काम केले. शिवरायांवर जिजाऊंनी स्वराज्याचे संस्कार केले. महिला म्हणजे फक्त चूल आणि मूल नाही. आपण सगळे एका वयात मुल होतो, आपले संगोपन आई करत असते, समाज घडवण्याचे, संस्कार देण्याचे काम आई करते. कोरोनाच्या संकटकाळात, अत्यंत कठीण परिस्थितीत महिला पोलिसांनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांनी खूप उत्तम काम केले.

महिलांचे कायदे, आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का हे पाहणे आपले कर्तव्य आहे. महिलांना सुविधा देणे, त्यांच्या मागण्या पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. महिला पोलिसांना कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागते, यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी आजपासून महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे ८ तास निश्चित केले आहेत. महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची महिलांच्या प्रश्नाविषयीची तळमळ नेहमी जाणवते. शासन महिला व बालविकास विभागाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *