युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत ?
युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत ?
मुंबई, दि 8 मार्च :
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहिर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. युवक काँग्रेसतर्फे अद्याप अध्यक्ष पदी नियुक्तीची औपचारिक घोषणा केली नसली तरी त्यांची या पदावर निवड जवळपास पक्की मानली जात आहे.त्यामुळे राज्यभर त्यांच्या चाहत्यांनी व युवक काँग्रेसच्या सदस्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे.
या निवडणुकीसाठी युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकी करिता प्रदेशाध्यक्ष पदाकरिता १४ उमेदवार रिंगणात होते. १२ नोव्हेंबर २०२१ ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली. सदस्य बनताच ऑनलाईनरीत्या प्रदेश अध्यक्ष,महासचिव, शहर अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष असे चार मत द्यावे लागले होते. सदस्यता अभियानानंतर दिल्लीवरून उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक ५,४८,२६७ मते मिळाली आहेत. राऊत यांनी अनेक दिग्गज उमेदवारांना मागे टाकले आहे. राऊत यांनी युवकांचा विश्वास जिंकत निवडणुकीत मोठ्या फरकाने मते मिळवली. ही मोठी बाब असल्याचे बोलले जात आहे. कुणाल यांचे जवळचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना 3,80,367 तर शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली.
ऑनलाईन मतांची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी नागपुर येथील बेझनबाग जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाईचं वाटप करून आनंद साजरा केला.
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र असून विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर एन एस यु आय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एन.एस. यु.आय.चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी २००९ पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच २०१८ च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
