शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे थांबवा !

0
fadnavis

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे थांबवा…

मुंबई, दि. ७ मार्च:

शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन कापण्याच्या मुद्द्यावर भाजपाने आज आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्राचे सरकार हे संवेदनहीन व कोडगे आहे. हे सरकार मुंबईच्या बिल्डरांना कोट्यावधी रुपयांची सूट देऊ शकते, दारूविक्री करणाऱ्यांना सूट देऊ शकते. हे बेवड्यांसाठी पॉलिसी तयार करू शकते पण हे सरकार शेतकऱ्यांना सवलत देत नाही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स कापली जात आहेत, असा हल्लाबोल करत ही वीज कनेक्शन कापने थांबवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधानसभेत शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा प्रश्न उपस्थित करत भाजपाने सरकारला धारेवर धरले. प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करून, मला आता जगण्यात रस नाही कारण हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतय, असं सांगून आत्महत्या केली. कारण, त्याचं वीज कनेक्शन या सरकारने कापलं होतं. ही गंभीर बाब आज सभागृहात आम्ही उपस्थित केली आणि तो एकटा सुरज नाही, तर कोट्यावधी शेतकऱ्यांची भावना या सुरजच्या बलिदानातून खरे म्हणजे सरकार समोर आली आहे. सातत्याने नापिकी आहे, कधी अतिवृष्टी आहे तर कधी अवर्षण आहे त्यामुळे विजेच्या बिलाची थकबाकी आहे. आमचे वीज कनेक्शन कापू नका अशी विनवणी शेतकरी करत असतानादेखील सरसकट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची विज कनेक्शन कापणे सुरू आहे.

वीज कनेक्शन कापणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दोनवेळा सभागृहात आश्वासन दिले होते. ५०० – ७०० रुपये शेतकऱ्यांनी भरली तरी देखील आम्ही वीज कनेक्शन मे महिन्यापर्यंत कापणार नाही. परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही. ऊर्जामंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि या पवित्र सभागृहाचा अपमान करत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सर्रास सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *