पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार

0
IMG_20220307_000557

पुण्याच्या विकासासाठी केंद्र सरकार सहकार्य करणार..

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.

पुणे, दि.६ मार्च:
पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा गरजेच्या असून त्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकार सहकार्य करेल, असे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले.

एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतुकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल.

देशात वेगाने शहरीकरण होत आहे. २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतुकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.

आज देशातील दोन डझनापेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे. शहरातील सर्वस्तरातील नागरिकांनी मेट्रो रेल्वेत प्रवासाची सवय लावून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

एकविसाव्या शतकात शहरांना अधिक आधुनिक बनवावे लागेल आणि नव्या सुविधांचे निर्माणही करावे  लागेल. भविष्यातील शहरांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. प्रत्येक शहरात पर्यावरण अनुकूल वाहतुकीला आणि त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सर्व सुविधांना आधुनिक बनविणारे एकात्मिक नियंत्रण केंद्र असावे. शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन पद्धत आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असणे गरजचे आहे. जलस्त्रोतांच्या आणि ऊर्जेच्या पूर्ण कार्यक्षम उपयोगावर भर देणेही आवश्यक आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.


शहरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी  प्रयत्न होत आहे. पुण्याची ओळख ‘ग्रीन फ्युएल सेंटर’ म्हणून होत आहे. प्रदूषणपासून मुक्ती, कच्च्या इंधनाच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी  इथेनॉल आणि जैविक इंधनावर भर देण्यात येत आहे. पुण्यात इथेनॉल ब्रँडीगशी निगडीत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पुण्याला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प सुरू केले आहेत. पूर नियंत्रणासाठी हे प्रकल्प उपयुक्त ठरतील. मुळा-मुठा नदीची स्वच्छता आणि  सुशोभिकरणासाठी केंद्र सरकार मदत करीत आहे. नद्या पुनरुज्जिवीत झाल्यास शहरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. शहरातील नागरिकांनी वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा. नदीच्या प्रती श्रद्धा, पर्यावरण विषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांनी नद्यांचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.

पुणे महानगरपालिका परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्या पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *