नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही !
नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही !
मुंबई, दि. २ मार्च :
विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.
प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की,
नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे – नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे. विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात.
शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणारआहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक आदरणीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल असेही जयंत पाटील म्हणाले.
