नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारणार !

0
IMG-20220228-WA0077

नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारणार !

नाशिक , दि. 1 मार्च:
शिक्षणाचा विस्तार सर्वत्र होऊन सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यात उपकेंद्रांची निर्मीती करण्यात येत आहे. यानुसार नाशिक येथील उपकेंद्राचे काम करण्यासाठी त्वरीत निविदा प्रक्रीया पूर्ण करून पुढील नियोजित कामास गती देण्यात यावी. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामनगांव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र व शासकीय तंत्रनिकेतन याबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व मुक्त विद्यापीठाच्या समन्वयाने घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक दृष्ट्या देशातील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याकरिता राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहे.

विद्यापीठांतर्गत असणारे महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतन मध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंरोजगार संस्था यांना प्राधन्य देण्यात यावे. शासकीय तंत्रनिकेतनचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्याला क्रिडा संस्कृतीचा वारसा असल्याने शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल खेळांच्या सरावासाठी मैदानची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *