खासदार संभाजी राजेंचे उपोषण अखेर मागे

0
raje

खासदार संभाजी राजेंचे उपोषण अखेर मागे..

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आझाद मैदानावर उपोषणस्थळी जाऊन संभाजीराजे यांची भेट घेऊन राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांना दिली.

उपोषण सोडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, येथे उपस्थित असलेल्या आणि येथे नसताना कायम पाठिंबा देणाऱ्या सर्व मराठा संघटनांचे मी आभार मानतो. हे सर्व मला २००७ पासून पाठिंबा देत आहेत. या सर्व संघटनांनी दाखवून दिले की हा खऱ्या अर्थाने शाहूंचा वंशज आहे. राजे तुम्ही फक्त कोल्हापूरसाठी मर्यादित राहायचे नाही तर महाराष्ट्र आणि देशापर्यंत शिवाजी महाराजांचे नाव नेण्याची तुमची जबाबदारी आहे असं या संघटनांनी सांगितले.

मराठा आरक्षण मिळणे ही दीर्घकालीन व न्यायालयीन प्रक्रिया आहे तोपर्यंतच्या काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये. होणाऱ्या अन्यायाची तीव्रता कमी व्हावी, यासाठी सकल मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आमचा हा लढा आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपण वरील प्रश्न शासकीय पातळीवर सोडवू शकतो. गरीब मराठा समाजासाठी आपण यामध्ये नक्कीच पुढाकार घ्याल, ही अपेक्षा बाळगतो, असे संभाजीराजे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते.

मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणातंर्गत 9 सप्टेंबर 2020 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण कोर्टाच्या निर्णयानंतर या नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. दरम्यान या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मराठा समाजातील युवकांना अधिकाधिक नोकऱ्या पुरवण्यासाठी प्रयत्न करणार. सारथीचे व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत याची पूर्तता करणार. सारथी संस्थेमध्ये रिक्त असणारी पदं 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार. सारथी संस्थेच्या आठ उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव देखील 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळासमोर ठेवणार. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 100 कोटींपैकी 80 कोटी दिले असून आणखी 20 कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटी निधी देणार. मराठा समाजातील बांधवांना व्याज परतावा संदर्भात कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देऊ. यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत. तसंच परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्ज फेडताना व्याज परताव्यासाठी नवी पॉलीसी ठरवू. तसंच कर्जाची मुदत 10 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळासह इतर संस्थासाठी पूर्णवेळ महासंचालक, तसंच इतर कर्मचारी पदांवरही नियुक्ती करु. विविध जिल्ह्यात स्थापन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाची यादी मागवून त्याचा पाठपुरावा करु, तसंच सद्यस्थितीला तयार वसतिगृहाचं गुढीपाढव्यादिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करु. कोपर्डी प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यासाठी महाधिवक्त्यांना सूचना करणार. मराठा आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याबाबत आढावा बैठक घेऊ, प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येतील. मराठा आंदोलनात मृत आंदोलकांच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. कागदपत्र पूर्तता करुन योग्य निर्णय घेऊ, अशा सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *