देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात साकारणार
देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात साकारणार…
रत्नागिरी, दि. 27 फेब्रुवारी :
मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, ती जगाच्या पाठीवर पोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.
कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद, मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. यासाठी आपण सर्वांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाचनाचे महत्व या विषयावर आपले विचार मांडणा-या आलिया या मुलीचे त्यांनी कौतुक केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
खासदार विनायक राऊत आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की शासन स्तरावर मराठी भाषा समृद्ध, सुदृढ होण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते करण्यात येत आहे.
