मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय?
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय?
मुंबई, दि. 24 फेब्रुवारी:
नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपाने या कारवाईचे स्वागत करत महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले. 9 ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. त्यातील एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांचे आहे.
मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
प्रसार माध्यमांनी बोलताना फडणवीस म्हणाले की, जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील तर ते अतिशय गंभीर आहे. कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील 55 लाख रूपये हे हसिना पारकरला मिळाले. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट ईडीच्या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे. देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय?मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयाण ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रूला मदत करणार्यांची गय केली जाऊ नये.
माझ्याकडे जितके पुरावे होते, ते मी सर्व यंत्रणांना दिले होते. देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठिशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही.
