ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई
ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी :
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने ठाकरे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका देत मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेतले. पहाटे पाच वाजताच ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील घरी पोहचले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात आणले.
मुंबई बॉम्बस्फोटातील एका आरोपीच्या जमीन खरेदी विक्री व्यवहार व माफिया दाऊद इब्राहिम कनेक्शन संदर्भात ही कारवाई केल्याचे समजते. दाऊदचा भाऊ इकबाल कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर मलिक यांच्यावर कारवाई केल्याचे समजते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीत नवाब मलिक यांच्यावर या जमीन व्यवहारासंदर्भात आरोप केले होते.
कुर्ल्यातील मोक्याच्या ठिकणची तीन एकर जमीन कवडोमल दराने विकत घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. ही जमीन मुंबई बॉम्बस्फोटातील एका आरोपाची असल्याचा आरोप आहे.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील नवाब मलिक हे दुसरे मंत्री आहेत ज्यांच्यावर ईडीने कारावई केलेली आहे. तर अनिल परबसह इतर नेतेही ईडीच्या रडारवर आहेत.
