शिरापूर, आष्टी योजना २०२३ आधी पूर्ण करु!
शिरापूर, आष्टी योजना २०२३ आधी पूर्ण करु!
मोहोळ, सोलापूर, दि. २२ फेब्रुवारी:
शिरापूर, आष्टी योजना २०२३ आधी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. जेवढा निधी लागेल तेवढा देण्याचे काम करू आणि या योजनेसह इतरही योजना पूर्ण केल्या जातील. मोहोळ भागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी परिस्थिती विचित्र होती. लोक पक्ष सोडून जात होते. राष्ट्रवादीचा निकाल चांगला लागणार नाही, असे भाकीत व्यक्त केली जात होती तेव्हा शरद पवार यांनी संपुर्ण राज्याचा झंझावाती दौरा केला. सोलापूरातही भव्य सभा घेण्यात आली आणि लोकांनी आम्हा सर्वांना साथ दिली. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार नाही, असे सतत बोलले जात होते. मात्र पवारांचे मार्गदर्शन व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले.
आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये ताकदीने लढा आणि चांगले यश मिळवा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मा. आ. राजन पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, युवा नेते अजिंक्य राणा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवती जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
