माढा भागात पाण्याचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही
माढा भागात पाण्याचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही….
माढा, दि. २२ फेब्रुवारी :
आपली पक्ष संघटना संपूर्ण पारदर्शक होईल असे काम करा…संघटना क्रियाशील आणि ताकदवान झाली पाहिजे…पक्ष नेतृत्वाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत जाईल अशी यंत्रणा उभी करा, असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माढा येथील सभेत दिला.
सोलापूर जिल्हयात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आली असून तिसरी आढावा सभा माढा विधानसभा मतदारसंघात पार पडली.
आमदार बबनदादा शिंदे यांचे एकही काम, एकही मागणी अपूर्ण राहत नाही. राज्यातील मंत्री दादांची प्रत्येक मागणी पूर्ण करतात. मी अर्थमंत्री होतो तेव्हा सिना बोगदा मंजूर केला होता आणि त्याला भरीव निधी दिला गेला होता. पाण्यासाठी एक मोठे काम बबनदादांच्या मागणीनुसार झाले आहे. यापुढे या भागात पाण्याचा कोणताही प्रश्न प्रलंबित ठेवला जाणार नाही असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
शरद पवार यांच्या विचारांना माढा तालुक्याने नेहमीच सहकार्य केले आहे, यापुढे कराल याची मला खात्री आहे. राष्ट्रवादीचे हात आणखी बळकट करण्यासाठी संघटना मजबूत करा. माढा लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून येईल यासाठी प्रयत्न करा.
महाविकास आघाडीच्या निमित्ताने १७० आमदारांचा पाठिंबा आपल्याला आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी घेत आहे. या सगळ्यात सर्वसामान्यांची साथ हवी असेही जयंत पाटील म्हणाले.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार बबनराव शिंदे यांनी आपले विचार मांडले.
या सभेला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आमदार बबनराव शिंदे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, व्यापार व उद्योग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, भगीरथ भालके, कल्याणराव काळे, माढा सभापती रणजितसिंह शिंदे, माजी सभापती संजय पाटील, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, युवती जिल्हाध्यक्षा श्रेया भोसले, तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
