किल्ले शिवनेरीवर  शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा..

0
shivneri 1

किल्ले शिवनेरीवर  शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा..

शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा विकास करणार.

पुणे, दि. १९ फेब्रुवारी:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे. गड किल्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव  उत्साहात साजरा झाला, त्यावेळी पवार बोलत होते.

पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले. महाराजांसारख्या युगापुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. ४०० वर्षानंतरही शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणि अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रत्येक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे.

छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची महाविकास आघाडी शासनाची भूमिका असून यासाठी पुरातत्व, पर्यावरण, वन विभागाच्या माध्यमातून जुन्या बांधकाम रचनेला धक्का न लावता या वारसास्थळांचे जतन करण्यात येईल. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड  संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून अनेक विकासकामे तेथे सुरू आहेत.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी उपमुख्यमंत्र्यांनी वाहीली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *