नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणार!

0
eknath shinde

नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणार!

नवी मुंबईतील ‘त्या’ झोपडपट्टीवासियांचे क्लस्टर योजनेतून पुनर्वसन

नवी मुंबई, दि. १९ फेब्रुवारी :

नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून पूर्णपणे नियमित करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांचे ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना राबवून पुनर्वसन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

तुर्भे येथील एका कार्यक्रमात बोलताना नगरविकास मंत्रि एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रत्येकवेळी सरकार बदलल्यावर याच प्रश्नावर वारंवार चर्चेच्या फेऱ्या झडत मात्र ठोस तोडगा काही केल्या निघत नव्हता. अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रकल्पग्रस्तांसोबत वारंवार बैठका घेऊन याबाबत सर्वमान्य तोडगा शोधून काढला आहे. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरूपी नियमित होणार असून दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला हा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबत निर्णय घेतला असून लवकरच तो जाहीर करण्यात येईल असे मंत्री शिंदे यांनी तुर्भे येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला संबोधित करतांना जाहीर केले. त्यासोबतच नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना राबवून इथे राहणाऱ्या झोपडपट्टी वासीयांचे कायमस्वरूपी घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल.

नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील अनेक नागरिकांचा जीव रस्ता ओलांडताना अपघात घडल्याने गेला असल्याची बाब यावेळी निदर्शनास आल्याने याठिकाणी लवकरात लवकर पूल उभारण्यात येईल. या परिसरातील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील मोकळ्या जागेवर अद्ययावत रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नवी मुंबई आयुक्तांना तातडीने निर्देश देऊन या जागेवर महानगरपालिकेतर्फे  रुग्णालय उभारण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

याच कार्यक्रमात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘महिला दक्षता पथका’च्या नवीन लोगोचे अनावरण शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच या पथकाचे नवी मुंबईत आणि राज्यभरात काम पाहणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना त्यांची नियुक्तीपत्रे यावेळी प्रदान  करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *