पाचव्या-सहाव्या मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती

0
20220219_112745

पाचव्या-सहाव्या मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती.

ठाणे, दि. 19 फेब्रुवारी :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला

प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गिकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असतील. या दोन्ही मार्गिकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर ३६ नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश आहे.

अनेक आव्हानांचा सामना करत ठाणे – दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याचे समाधान आहे. या मार्गिकांवर डझनभर पूल बांधण्यात आले असून फ्लायओव्हर आणि बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याकामासाठी कामगार, अभियंते यांनी दिवसरात्र मेहनत करुन राष्ट्रनिर्माणाच्या कामात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

मुंबई उपनगरीय सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून सुमारे ४०० कि.मी. लांबीची अतिरिक्त मार्गिका उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वाढतील असे प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय रेल्वेला आधुनिक करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून कोरोना काळात गेल्या दोन वर्षात माल वाहतुकीमध्ये रेल्वेनी विक्रमी कामगिरी केली आहे. कोरोना काळत किसान रेल्वेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्याचे काम करण्यात आले. आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *