20220218_200625

ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण !

ठाणे, दि. १८ फेब्रुवारी :
ठाणे जिल्ह्यातील वेहळोली गावात बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव
झाला असून जिल्ह्यात इतर कुठेही बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना केल्या जात आहेत. या परिसरातील १ कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

या संदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले की, मौजे वेहळोली, ता.शहापूर जि.ठाणे येथे काही कोंबड्या दगावल्या होत्या. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल मिळाला. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बर्ड फ्लूचा संसर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही पसरु नये यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार बर्ड फ्लू बाधित क्षेत्र केंद्रबिंदू मानून १ कि.मी. त्रिज्येतील परिसर संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील पोल्ट्री फार्म मधील कुक्कुट पक्षी, उर्वरित पक्षी खाद्य, अंडी नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या भागातील कुक्कुट पक्षांचे जिल्हा पशुसंधर्वन उपायुक्त यांच्या मार्फत शिघ्रकृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पध्दतीने प्रभावीत पक्षांना नष्ट करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जो पर्यंत बाधित क्षेत्र संपूर्णत: संसर्गमुक्त क्षेत्र म्हणून घोषित होत नाही. तो पर्यंत या १ कि.मी. त्रिज्येतील चिकन विक्रेते व वाहतूकदार यांचे दैनंदिन कामकाज रोखण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

वेहळोली वगळता जिल्ह्यात अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची घटना नाही.संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *