संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेऊन बुडणार !
संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेऊन बुडणार !
मुंबई, १६ फेब्रुवारी
मोहित कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील का ? याची काळजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करू नये. पण संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले .
चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांना बुडवतील. याची काळजी संजय राऊत यांनी करू नये. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही समर्थ आहोत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘पे रोल’वर राहून पवार साहेबांचा अजेंडा चालविणारे संजय राऊत हे अंतिमतः वाट लावणार आहेत व आपल्याला खड्ड्यात घालणार आहेत, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेले दिसत नाही.
अडीच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना युती तोडण्यासाठी भरीस घातले. भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेनेने मुस्लिम मतांच्या मागे लागून आपला मूळ पाया संपविला. यामुळे आपल्याला मानणारी जनता तसेच आपले जुने नेते – कार्यकर्ते सोबत राहणार नाहीत, हे उद्धवजींच्या लक्षात येत नाही.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत १९ बंगल्यांचा विषय एक वर्षापूर्वी मांडण्यात आला. या काळात संजय राऊत याविषयी बोलले नाहीत. संजय राऊत स्वतः किंवा त्यांचे सीए किंवा त्यांच्या मुलींपर्यंत विषय येत नव्हता तेव्हा त्यांच्यासाठी सर्व काही आलबेल होते. आता त्यांच्या गळ्याशी विषय आल्यानंतर त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शिवसेना वापरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील शिवसैनिकांची संख्या कमी पडली तर नाशिक व पुण्यातून शिवसैनिकांना आणले. ही पत्रकार परिषद शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावरील हल्ले परतविण्यासाठी होती तर आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे हे सेनेचे नेते का उपस्थित नव्हते, असा प्रश्न निर्माण होतो.
