चर्मकार समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेणार.
चर्मकार समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेणार.
पुणे, दि.१६ फेब्रुवारी :
सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत राज्यातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. महामंडळाचे भागभांडवल यावर्षी पासून वाढविण्यात येणार असून याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शिवशंभूनगर, कात्रज, पुणे येथील गुरु रोहिदास (रविदास) महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास महाराज यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय ‘संत रविदास पुरस्कार’ कोविडमुळे गेली दोन वर्षे स्थगित होता, या पुरस्कारांची यावर्षी घोषणा करण्यात येतील. प्रत्येक समाज घटकाला समान वागणूक मिळावी, जाती-पातीच्या भिंती कोसळून एकमेकांप्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा या महान विचारसरणीचा संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार आणि प्रसार करून देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोहचवले.
कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले, तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
