येवला मतदारसंघ टँकरमुक्त करणार
येवला मतदारसंघ टँकरमुक्त करणार !
नाशिक, दि. 16 फेब्रुवारी:
कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेल्या येवला मतदार संघाला टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून केला जात आहे. राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व धुळगावसह अठरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजना पूर्ण झाल्यानंतर येवला मतदारसंघ हा टँकरमुक्त होईल.
या पाणी पुरवठा योजनेसाठी नांदूरमधमेश्वर धरणातून पाणी उचलले जाणार आहे. यासाठी ३.७३७ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदूरमधमेश्वर धरणातून हे पाणी शुद्धीकरणासाठी येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथे आवश्यक असलेली जागा खासगी वाटाघाटीतून उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी हे कार्यवाही करत आहेत.
सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. पन्हाळसाठे येथून ग्रॅव्हीटीद्वारे सर्व गावांना पाणीपुरवठा होणार आहे.
तसेच येवला तालुक्यातील अडतीसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांवसह १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्याच्या सूचना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार या योजनेचे मंजुरीचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ५८ कोटी ८१ लक्ष इतका निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले असून या योजनेचा देखील मार्ग मोकळा झाला आहे.
येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत धुळगाव, पिंपळगाव लेप, एरंडगाव खु., एरंडगाव बु., जळगाव नेऊर, नेऊरगांव, देशमाने बु., मानोरी बु., शिरसगाव लौकी, सतारे, भिंगारे, पुरणगाव, मुखेड, जऊळके, चिंचोली बु., चिंचोली खु., सताळी, बदापूर या गांवाचा समावेश आहे. या सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण येवला तालुका हा टँकरमुक्त होणार आहे.
त्याचप्रमाणे यशस्वीपणे चालू असलेली ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील प्रत्येक झोन मधील पाणी उपसा पर्यायी सयंत्रे अकार्यक्षम आणि नादुरुस्त झाले आहे. त्याची सुद्धा दुरुस्ती आणि पंप हाऊस मधील पंप बदलीकरणे गरजेचे आहे अशी सूचना देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. जलजीवन मिशन मधून रेट्रोफिटिंग योजनेतून हे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
