शेतकरी हितासाठी वायनरी उद्योगास प्रोत्साहन !
शेतकरी हितासाठी वायनरी उद्योगास प्रोत्साहन !
नाशिक, दि. 12 फेब्रुवारी:
शेतकऱ्यांच्या हितासाठी वायनरी उद्योग वाढीस शासन प्रोत्साहन देत आहे. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शाश्वत विकासात लोकसहभाग तितकाच आवश्यक असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
भुजबळ यांच्या हस्ते नाटेगाव व येवला तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक हे द्राक्ष उत्पादनाचे माहेरघर आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी जास्त प्रमाणात असून या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत. या अडचणी शासनाने घेतलेल्या वाईन उद्योग प्रोत्साहन निर्णयाने दूर होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे अधिकाधिक फायदा होणार आहे.
३८ गाव पाणी पुरवठा योजनेमध्ये जवळपास ५९ गावांचा समावेश झाल्यामुळे येवला तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेवर अधिक ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यासाठी आता धुळगाव व राजापूर साठी स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. शासनकडून राबविण्यात येत असलेली सर्व विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
